गेटवर माझी जात विचारली...एक अनोखा प्रवास ||आयुष्याच्या गोष्टी || Life Story 


          नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो.... !! मनोरंजन ( Entertainment ) Khasmarathi Special या भागात आम्ही तुमच्यासाठी नवनवीन उत्सुकता आणि मनाला कुतूहल लावणाऱ्या जीवन कथा ( Life story ) तसेच प्रेमकथा ( Love story ) घेऊन येत आहोत , या लेखात तुम्ही एक अनोखी कथा पाहणार आहात . जिचं नाव गेटवर माझी जात विचारली...एक अनोखा प्रवास || आयुष्याच्या गोष्टी || Life Story आहे जी वाचताना नक्कीच तुमच्यातील उत्सुकता वाढेल .
गेटवर माझी जात विचारली...एक अनोखा प्रवास || आयुष्याच्या गोष्टी || Life Story
गेटवर माझी जात विचारली...एक अनोखा प्रवास || आयुष्याच्या गोष्टी || Life Story


          बागकामात तरबेज होत असताना कामाचा व्यापही वाढत गेला. जितकी जास्त कामं तितकी कमाई जास्त...असं मी बारावी पास केल्यानंतरचं माझ्या आयुष्याचं साधं गणित होतं. कुठूनतरी खबर लागली की मेनन साहेबांना बगिचा आणि झाडझूड करण्यासाठी माणूस हवा. बातमी ऐकली आणि आनंद झाला. चला आणखी एक काम मिळेल म्हणून आतल्या आत खुश झालो.


          खडखड करणार्‍या सायकलीवर टांग मारली आणि मेनन साहेबाला भेटायला निघालो. गल्लीत शिरलो, दारावर पाटी पाहिली. लष्करातून निवृत्त झालेल्या कर्नलचं घर होतं ते. गेटच्या बाहेरून आवाज दिला तर कुत्रं भुंकायलं लागलं. सालं आयुष्यात माणसं कमी होती की काय म्हणून त्या कुत्र्यानेही आपली हौस पूर्ण केली. सडपातळ अंगकाठीचा व्यक्ती बाहेर आला....कामाविषयी विचारलं अन एकजण लागतोय असं ते बोलले. आत बोलवण्याआधी त्यांचा एक प्रश्न काळजात खोलवर घाव करून गेला...कारण  तो प्रश्न होता....कौनसे जाती के हो...?


सुन्न झालो आतून, आत एकदमच कालवाकालव झाली. नाइलाजानं जात सांगितली. समोरून पुन्हा प्रश्न आला...सच में...?


          मी हो म्हटलं तेव्हा मला त्यांनी गेटच्या आत घेतलं. महिन्यातून 8 दिवस यायचं. पगार 500 रूपये ठरला. आनंदाने बाहेर पडलो. कारण आधी 500 रूपयांसाठी 15 दिवस काम करावं लागायचं आणि आता इथे मात्र फक्त 8 दिवस काम करावं लागणार होतं. कर्नल साहेब मूळचे केरळचे. पण लष्करात भरती होऊन पोस्टींग देवळालीत झाली आणि रिटायर झाल्यानंतरही ते देवळालीतच स्थायिक झाले. ठरल्याप्रमाणे पहिल्या दिवशी कामाला सुरूवात केली.


          साहेबाने जशी गेटवर जात विचारली तशी मीदेखील झाडांची, फुलांची जात विचारत होतो आणि तसंही जात कुणाला चुकत असते का...? पण कर्नल साहेब कमालीचे हुशार. इंग्रजी तर फाडफाड बोलायचे. त्यांची पत्नी आधी माझ्यावर चिडत. जास्तीची कामे सांगत. गेट उघडून गेलं की झाडू घ्यायचा आणि सगळं अंगण झाडून घ्यायचं. नंतर विळा हातात घेऊन तण काढायचं. झाडांना पाणी मारायचं. सूर्य अस्ताला जाताना पाण्याच्या फवार्‍यात इंद्रधनू दिसायचं आणि जगण्याची उमेद आणखी वाढायची. आई जशी लेकरांना वाढवते तसं मी झाडांना जपायचो. टेंशन आलं, संकट आलं तर जास्वंदी, पपई, नारळ, आलं, कोरफड अशा अनेक झाडांशी मी बोलायचो. निःसंकोच गप्पा मारायचो. झाडं आपल्यादेखत मोठी होतानाचा आनंद वेगळाच असतो.

गेटवर माझी जात विचारली...एक अनोखा प्रवास || आयुष्याच्या गोष्टी || Life Story
गेटवर माझी जात विचारली...एक अनोखा प्रवास || आयुष्याच्या गोष्टी || Life Story

          झाडांसोबत माझ्या दुःखाचा बाजार मांडत असताना नकळत आसवं पानांवर पडायची. अंग सणसण करायचं, हात जड पडायचे, कंबर दुखायचं पण तरीही काम जवळचं वाटायचं. कधीकधी साहेबाची गाडी धुवायचो, पुसायचो. व्हॅगनार नाव त्या गाडीचं. वेळ मिळाला की साहेब केरळच्या गोष्टी सांगत. मोदी, गांधी, नेहरू, देश विदेश अशा गोष्टी समजावून सांगत. साहेबानं माझा स्वभाव ओळखल्यानंतर ते माझी काळजी करू लागले. कामाला सुरूवात झाल्यानंतर ग्लास भरून चहा यायचा. मळक्या कपड्यानिशी तो घटाघट प्यायचा. दुपारचं जेवण असचं बाहेर होऊन जायचं.


          साहेब केरळचे प्रसिद्ध चिप्स, मिठाई द्यायचे. भूक लागली की खायला पोळी-भाजी द्यायचे. पण मी स्वतःहून कधीही काही मागितलं नाही. तो आपला स्वभाव कालही नव्हता आणि आजही नाही. एकदा काम करत असताना गांधीमाशी चावली. ती सणसण सुद्धा कठोर मनाने मी अक्षरशः एन्जॉय केली.


          मेनन साहेबाकडे उषा नावाची कामवाली यायची. तिनंही भरपूर जपलं. चार चांगल्या गोष्टी सांगितल्या. तु एवढ्या वयातही न लाजता काम करतो आणि आमची पोरं अशीच हिंडतात असं ते नेहमी बोलायची. बाजूच्या साहेबाकडेही पोळ्या लाटायला मिना नावाची बाई यायची. तिच्यासोबतही ओळख झाली होती. बिचारी साहेब नसली की गुपचुप मला चहा द्यायची. कामवाल्या बायांमुळे आणि त्यांच्या संघर्षाच्या गाथांमुळे पवन प्रगल्भ होत गेला.


          मेनन साहेबाच्या बायकोनं एकदा ओट्स खातो का असं विचारलं. मला ओट्स म्हणजे हेसुध्दा माहित नव्हत, पण पोटात कळवळ होत असल्यानं मी हो म्हटल. तिनं ओट्स वाटीत आणून दिले आणि घरात गेली. अंधार व्हायला आला होता. मळक्या कपड्यानिशी भिंतीला टेकलो, एकटक गेटकडं पाहत राहिलो....समोर काही नव्हत तरीही मी फक्त पहात होतो. कारण तो गेट माझ्या जगण्याला बदलत होता. डोळ्यात पाणी आलं, गालावर ओघळलं...ओघळू दिलं. अंग घामाघूम झालं होतं. पाय थरथरत होते, तितक्यात मॅडम बाहेर आली, तसं मी स्वतःला सावरलं.


          कर्नल साहेब मला खूप काही शिकवायचे, अभ्यास कर, पेपर पढ, दुनिया का अंदाज ले असं खूप काही सांगायचे. नंतर नंतर तर अगदी लेकराप्रमाणे वागवत. हळूहळू तिथली सगळी गल्ली माझ्या ओळखीची झाली. पगाराचे मिळणारे 500 रूपये तेव्हा खूप उपयोगी पडायचे. कधी वाटलं तर गरीबदास हॉटेलचा पाववडा किंवा भेलपूरी खायला जायचो. तेवढचं समाधान मिळायचं. 29 जुलैला माझा वाढदिवस असतो हे साहेबाला माहित होतं.


          त्यादिवशीच काम आटोपलं आणि मला त्यांनी घरात बोलवलं. ज्या माणसानं गेटवर मला जात विचारली, त्यानं मला कित्येक महिन्यानंतर पहिल्यांदा घरात बोलवलं होतं. गोडं खाऊ घातलं आणि वाढदिवसाची बक्षिसी म्हणून मला 50 रूपये दिले. पाया पडून साहेब, त्यांचे वडील आणि मॅडमचा आशिर्वाद घेतला आणि बाहेर पडलो. ते 50 रूपये मी सारखे बाहेर काढायचो आणि पहात बसायचो. कारण त्यात आशिर्वाद दडलेला होता. शिक्षण पुढे सरकत गेलं तसं या कामालाही रामराम केला.


          मेनन साहेबाने गेटवर माझी जात विचारली तेव्हापासून ते वाढदिवसाला दिलेली 50 रूपयांची बक्षिसी...हा एक अनोखा प्रवास दुनियादारी शिकवून गेला. आजही फोनमध्ये साहेबाचा नंबर आहे. आठवण आली तर कॉलदेखील लावतो. पण तो बंद येतो. एके दिवशी भेटायला जावं लागेल. ज्या झाडांनी माझ्या वेदना ऐकल्या, आता त्यांच्या वेदनाही ऐकाव्या वाटतात....आणि साहेबाला त्यांचीही जात विचारून यायचयं...




लेखन : ✍  © पवन सोमनाथ बोरस्ते
            ◾ 7058589767
            ◾ भगूर, देवळाली कॅम्प, नाशिक
➤ https://www.facebook.com/pavan.boraste.90


सुचना :-  ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे. 
या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत .



➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi



➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.



       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने