संसर्गजन्य चांगुलपणाची गोष्ट: सायकल
cycle movie review |
'सायकल' नावाचा मराठी सिनेमा बऱ्याच महिन्यांपासून पाहायचे मनात असूनही राहून गेले होते. कालपरवा प्रियदर्शन जाधवच्या व्हाट्सअप स्टेटस वर 'सायकल'ला दोन वर्षे झाल्याचा उल्लेख दिसला आणि आज-उद्या करता करता आपल्याला बराच उशीर झाल्याचे लक्षात येऊन लगेच सिनेमा पाहून घेतला.
ज्यांना सिनेमात वेग हवाय, सुष्टा-दुष्टातला संघर्ष हवाय, धडाधड घडणाऱ्या घटना हव्यात, हा-हा हसवणारे प्रसंग हवेत, शिव्यागाळी हव्यात, अंगावर येणारे फाईट सीन्स हवेत, नाचगाणी हवीत त्यांच्यासाठी हा सिनेमा नाहीये. जे काही आहे ते चांगले आहे, जे होत आहे ते चांगले आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच असेल असा विश्वास ठेवणाऱ्या भाबड्या मनाच्या, माणसाच्या चांगुलपणावर विश्वास अजूनही टिकवून असलेल्या वेड्या लोकांचा, वेड्या लोकांसाठी बनविलेला, अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टीतही आनंद लपलेला असतो, तो आनंद शोधणाऱ्या आणि साजरा करणाऱ्या (निदान तसं करावं हे वाटणाऱ्या), मनाचा नितळपणा टिकवून ठेवलेल्या लोकांसाठी हा सिनेमा आहे.
ही गोष्ट आहे १९५२ सालातील, कोकणातील एका गावातील ‘सायकल’वर जिवापाड प्रेम करणाऱ्या, व्यवसायाने ज्योतिषी असलेल्या केशवची. गावात आलेले दोन चोर केशवची सायकल चोरतात. त्यातून पुढे काय घडते, ते चोर ती सायकल का चोरतात, केशवला त्याची सायकल परत मिळते का? इतकीच सिनेमाची कथा.
मराठी सिनेमे, त्यातही सामाजिक आशय किंवा संदेश देणारे सिनेमे, हे बऱ्याचदा इतकं बोलतात की ते आपलं पूर्वीचं बोलपट हे नाव सार्थ करतात मात्र ‘सायकल’ या सिनेमातील पात्रांपेक्षा त्यातील चित्रचौकटी अधिक प्रभावीपणे बोलतात, डोळ्यातून थेट आत पोहोचतात.
सिनेमाची मांडणी इतकी साधी-सोपी, तरल आणि लोभस आहे की आपण त्याच्या प्रेमातच पडतो. यातील प्रत्येक प्रसंग अगदी नैसर्गिक आणि सहज वाटतो. अगदी पहिल्या फ्रेमपासून एक निर्मळ, निरागस भूत आपला ताबा घेते आणि सिनेमा संपेस्तोवर ते निरागस भूत आपल्या माथ्यावरून उतरत नाही, उतरावे असं आपल्याला वाटतही नाही. ज्योतिषी केशव, त्याची बायको, त्यांची छोटी मुलगी, टपरीचालक, सावकार, दोन्ही चोर आणि सायकल चोरीला गेल्यावर ती ज्या-ज्या गावात जाते, त्या गावात चोरांना भेटणाऱ्या सगळ्या माणसांच्या भाबडेपणाचा, निरागसपणाचा संसर्ग आपल्याला झाल्यावाचून राहत नाही.
एखाद्या प्रसंगी आपल्याला वाटून जाते कि या गावात, परिसरात सगळीच माणसे इतकी कशी चांगली असू शकतात? पण ती तशी असतील किंबहुना असावीत असं wishful थिंकिंग करायला काय हरकत आहे!
काही शिकवण्याचा आव न आणता, किंवा त्यासाठी ओढूनताणून प्रसंग न घुसवता मोजक्या प्रसंगातून, कुठेही बोजडपणा येणार नाही याची काळजी घेत सिनेमा जीवनावर सहजपणे भाष्य करतो. केशवने पेरलेली सकारात्मकता ज्याच्या हृदयात उगवून आली आहे असा गृहस्थ आपलं घरदार उजाड झाल्यावरही खचून न जाता म्हणतो, ‘आता बघा ना. काहीच नाही. दार नाही, खिडकी नाही. आत बाहेर वेगळं काही नाहीच. सगळं आपलंच वाटतं’. केशव जेव्हा आपल्या सायकलीचा ठावठिकाणा एका जेष्ठ ज्योतिषाला विचारतो तेव्हा तो म्हणतो, तुला सत्य हवं आहे असं नाहीये तर तुला ज्याने चांगलं वाटेल असं भविष्य मी सांगावं अशी तुझी इच्छा आहे.
©
ऋषिकेश जोशी, दीप्ती लेले, भाऊ कदम, प्रियदर्शन जाधव, विद्याधर जोशी, अभिजित चव्हाण या सगळ्यांनीच उत्तम नैसर्गिक अभिनय केलाय. मैथिली पटवर्धन ही बालकलाकार तर इतकी गोड दिसलीय की बस्स. दिग्दर्शक प्रकाश कुंटे, कथा-पटकथा-संवाद कार आदिती मोघे आणि छायाचित्रणकार अमलेंदु चौधरी ह्यांची कामगिरी देखील ए-वन झालीय.
जगातील चांगुलपणावर विश्वास असणाऱ्यांचा विश्वास वाढविणारा आणि नसणाऱ्यांच्या हृदयात विश्वासाचा कोंब पल्लवित करणारा, आजच्या भय आणि काळजीने भरलेल्या नकारात्मक जगात “ऑल इज वेल, उद्या सारं काही चांगलं होईल”, अशा सकारात्मक ऊर्जेचा संसर्ग पसरवणारा हा नितळ सिनेमा बघायलाच हवा.
© सॅबी परेरा*
टिप्पणी पोस्ट करा