Golda book marathi review | गोल्डा - एक अशांत वादळ

गोल्डा - एक अशांत वादळ
लेखिका: वीणा गवाणकर

Golda book marathi review
                             Golda book marathi review


इंदिरा गांधी, सिरीमाओ भंडारनायके आणि गोल्डा मेयर ह्या तीन स्त्रिया साधारणतः एकाच कालखंडात आपापल्या देशाच्या स्त्री-पंतप्रधान म्हणून जगाच्या नकाशावर चमकल्या. इंदिराजींना आपले आजोबा मोतीलाल नेहरूंपासून राजकीय परंपरा होती, भंडारनायके आपल्या पतीच्या निधनामुळे राजकारणात आल्या होत्या. पण गोल्डाला अशी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. केवळ ज्यूईश स्वातंत्र्याची आणि ज्यू निर्वासितांना इस्रायल या आपल्या स्वराष्ट्रभूमीमध्ये परत आणण्याची आंतरिक तळमळ तिला पंतप्रधानपदापर्यंत घेऊन गेली.

इस्रायलच्या पंतप्रधानपदी १९६९ ते १९७४ या कालावधीत विराजमान झालेल्या गोल्डा मेयर(Golda Meir) ह्यांनी आपल्या कर्तबगारीने हा काळ अक्षरशः गाजवला. इवल्याशा इस्रायल ह्या देशाची दखल संपूर्ण जगाला घ्यायला लावली. रुळलेली वहिवाट सोडून आपला स्वतःचा राजमार्ग शोधणाऱ्या गोल्डा या स्वयंभू व्यक्तिमत्वावर विविध भाषांत बरीच पुस्तके लिहिली गेली असली तरी त्यांच्या वैयक्तिक, राजकीय जीवनाचा सांगोपांग धांडोळा घेणारं, वीणा गवाणकर ह्यांनी लिहिलेलं 'गोल्डा - एक अशांत वादळ' हे एकमेव मराठी पुस्तक असावं.

स्वतःची भूमी हरलेले ज्यू जगभर वाट फुटेल तिकडे, त्या त्या देशात गेले आणि तिथलेच झाले होते. अशाच देशोधडीला लागलेल्या ज्यूचा वंशज असलेली, जन्माने रशियन असलेली, बालपणीच आईबरोबर अमेरिकेत स्थलांतरित झालेली, एका मध्यमवर्गीय निर्वासित कुटुंबात वाढलेली, ज्यू लोकांचं आपलं असं स्वतंत्र राष्ट्र हवं या विचाराने भारून गेलेली, इस्रायल या राष्ट्राच्या निर्मितीत मोठ्ठा वाटा असणारी, आपल्या वयाच्या सत्तरीनंतर पंतप्रधान पदावर आरूढ झालेली, बलाढ्य अमेरिकेशी इस्रायलचे राजनैतिक संबंध प्रस्तापित करण्यात यशस्वी ठरलेली, अरब राष्ट्राविरुद्ध युद्धात इस्रायलचं खंबीर नेतृत्व करणारी, युद्धातील अपयशाची जबाबदारी घ्यायला न कचरणारी, आंतरराष्ट्रीय पातळीवर धाडसी निर्णय घेऊन ते तडीस नेणारी, जगभरातील ज्यू लोकांवर आईच्या मायेने प्रेम करणारी, प्रखर राष्ट्रवादी, स्वत:ला स्त्रीवादी न म्हणवणारी मात्र स्त्रीवाद्यांसाठी रोल मॉडेल ठरलेली ही ‘गोल्डा’ - अर्थात ‘गोल्डा मेयर’ ही या पुस्तकाची चरित्र नायिका.

गोल्डाच्या निमित्ताने लेखिका वीणाताई गवाणकर आपल्याला १९७८ पर्यंतचा ज्यू धर्मीयांचा राजकीय, सामाजिक परिचय करून देता देता, अमेरिका-रशियातील शीतयुद्ध, तेलासाठी अरब राष्ट्रांचे महासत्तांना वाटणारे महत्व आणि त्यापायी होणारे आंतरराष्ट्रीय राजकारण, इस्रायलच्या निर्मितीच्या आगेमागे जगभरात घडलेल्या महत्त्वाच्या घटना, सत्तांतरे, चढ-उतार, राजकीय स्थित्यंतरे हा भलामोठा पट आपल्या रसाळ शैलीत उलगडून दाखवितात.

इस्रायल राष्ट्राची स्थापना व्हायच्या आधीची पार्श्वभूमी, राष्ट्र स्थापन होतानाच्या घडामोडी आणि नवीन राष्ट्राची उभारणी हा इस्रायल राष्ट्राच्या निर्मितीचा प्रवास आपणांस गोल्डाच्या सोबत घडविण्याचे उत्तम काम वीणा गवाणकर ह्यांनी केलेले आहे. एक होता कार्व्हर पासून साधलेली चरित्र लेखनाची हातखंडा शैली, पुरेशा पुराव्याशिवाय न लिहिण्याची शिस्त, चारित्र्यनायिकेच्या अनाठायी प्रेमात न पडता तसेच कुठलाही अभिनिवेश किंवा कुठलीही बाजू न घेता तटस्थपणे केलेली मांडणी यामुळे हे पुस्तक उत्कंठावर्धक आणि सुजाण वाचकाने चुकवू नयेच इतके वाचनीय झाले आहे.
Ⓒ*सॅबी परेरा*

2 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने