भुरा मराठी book सारांश | marathi book bhura review
भुरा वाचावं आणि वाचतचं जावं असं एक प्रांजळ आत्मकथन.भुराच्या संघर्षमय प्रवासातून उच्चशिक्षणाची प्रेरणा,ऊर्जा घ्यावी.भुरामध्ये जागोजागी दिलेले आयुष्यातील विविध महत्वपूर्ण तत्वज्ञान नोट करून ठेवावे.यातील तत्वज्ञान प्रत्येकाच्या आयुष्यात पावलोपावली एक मोठी भूमिका निभावणारे आहेत.(मी तर माझ्या स्टडी बंकर मध्ये लावतोय.)
भुरा फक्त वाचू नये तर समजून,उमजून घ्यावे.वेळ मिळेल तसं भुरा चाळत राहावे.आपल्या आयुष्यात वेळोवेळी पडलेल्या काही प्रश्नांचे उत्तर तुम्हांला आपोआप भुरा मध्ये मिळत जातील.
मुख्य भुराचा संघर्ष हा फक्त भुराचा नाही तर तो त्याच्या सारख्या ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांचा आहे.एकंदरीत आपला आहे.भुरा ते प्राध्यापक शरद बाविस्कर होण्यापर्यंतचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता.हा प्रवास तमाम संघर्षानी भरलेला आहे जो असंख्य वाचकांना लागू होतो किंवा पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देतो.आजच्या काळात जेव्हा 10/12 वी मध्ये फक्त काही गुण कमी आल्या कारणाने काही विद्यार्थी निराश होऊन आत्महत्येसारखा टोकाचा पाऊल उचलतात.त्या विद्यार्थ्यांनी 10 वी मध्ये इंग्रजी विषयात नापास होऊन JNU सारख्या प्रतिष्ठित विद्यापीठात प्राध्यापक होणाऱ्या भुराचा प्रामाणिक आत्मकथन तर एकदा नक्कीच वाचायला हवा.
जिद्द,इच्छाशक्ती,आत्मविश्वास,स्वाभिमान आणि मेहनतीचा खरा अर्थ भुरा मध्ये वाचायला,अनुभवायला मिळतो.आपल्या विचारांशी कुठलीही तडजोड न करता आपल्या मार्गांवर कसं मार्गक्रमण करत राहायचं हे भुरापासून शिकण्यासारखी मोठी गोष्ट आहे.भुरा हा समाजातील असंख्य तळागाळातील पहिल्या शिकणाऱ्या पिढीचं प्रतिनिधित्व येथे करतो.कोणत्याही प्रकारची अनुकूल पार्श्वभूमी नसताना संघर्ष करत,मोठी स्वप्न बघता बघता उच्चशिक्षण घेण्यासाठी वाट्टेल ते कष्ट करण्याची तयारी ही भुराची एक सर्वांत मजबूत बाजू होय.आणि यातून एक कमालीची प्रेरणा घेऊन असंख्य विद्यार्थी आपले भवितव्य घडवू शकतात यात काहीच वाद नाही.शिक्षणाकडे फक्त उदरनिर्वाहचा साधन न बघता सर्वांगीण उन्नतीचा साधन म्हणून बघणारा भुरा जेव्हा म्हणतो की "शिक्षण हे स्वातंत्र्याचा समानार्थी शब्द आहे " यातून शिक्षणाचा महत्व वाचकांना कळतो.आणि शिक्षण हे किती महत्वाचं आहे हे वाचकांना कळून चुकते.
आपल्या उच्चशिक्षणाप्रति असलेल्या ध्यासाबद्दल भुरा म्हणतो ,
शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त रंग देण्याचा प्रयत्न करणे आणि कॅन्व्हासचा आकार जेवढा वाढवून देता येईल तेवढा वाढवून देणे. शिक्षण म्हणजे मुलामुलींच्या हातात रेडीमेड पेंटिंग देणे नव्हे. शिक्षणाविषयी जी स्पष्टता मला २०२० मध्ये आली ती १९९७ मध्ये सुद्धा होती, असं म्हणणं तथ्यसंगत नसेल. तेव्हा एवढंच माहिती होतं की, ज्या परिस्थितीत फसलेलो होतो त्या परिस्थितीतून सुटका करून घ्यायची आणि अशा जगात शिरायचं होतं जिथं माणूस म्हणून पूर्णत्वाची ओळख पटेल. पूर्णत्व म्हणजे काय ह्या विषयीसुद्धा अस्पष्टता होती, पण ज्या परिस्थितीत होतो ती पूर्णत्वास पूरक नाही एवढं मात्र स्पष्ट होतं. शिक्षण हा एकमेव सुटकेचा मार्ग आहे, याची मात्र पूर्णपणे खात्री होती. सर्वार्थाने सुटका. केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे. २००२ नंतर जेव्हा माझ्या बरोबरीची पोरं पैसे कमवायच्या नादात मला सांगत असत की, पैसा सब कुछ होता है मेरे यार वगैरे वगैरे!, तेव्हासुद्धा मी शिक्षणाची वाट सोडली नाही. खरंतर माझी आर्थिक परिस्थिती त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने वाईट होती; पण मी मात्र शिक्षणाची वाट सोडायला तयार नव्हतो.
यातून आपल्याला भुराचा ध्यास आणि शिक्षणाबद्दल असलेली तळमळ जाणवते.आजच्या काळात सर्वकाही असताना सुद्धा शिक्षणाचं महत्व माहिती नसणाऱ्या व फक्त शिकायचं म्हणून शिकणाऱ्या त्या असंख्य विद्यार्थ्यांच्या डोळ्यात वरील वाक्य हे झळजळीत अंजन घालून जातो एवढं नक्की.यासोबत देशाच्या विविध प्रतिष्ठित विद्यापीठात जाऊन उच्चशिक्षण घेण्याबरोबरच आपण विदेशातील नावाजलेल्या विद्यापीठापर्यत सुद्धा झेप घेऊ शकतो.हा आत्मविश्वास भुरा तळागाळातील विद्यार्थ्यांना देतो.आणि इथपर्यंत नेमकी मजल कशी मारायची आणि उच्चशिक्षण का गरजेचं आहे ? याबद्दल कमालीचं मार्गदर्शन सुद्धा करतो.डॉक्टर, इंजिनिअर,Upsc/Mpsc सारख्या स्पर्धा परिक्षा सोडून इतर असंख्य शिक्षणाच्या शाखा उपलब्ध आहेत.असंख्य नावाजलेल्या विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन वेगवेगळ्या विषयांत आपण पदवीधर आणि पदव्युत्तर होऊ शकतो..असंख्य अश्या स्कॉलरशिप साठी Apply करून विदेशात उच्चशिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतो.पदवी किंवा पदव्युत्तर होण्यासाठी फक्त काही निवडकच विषय न निवडता विविध विषय निवडू शकतो आणि त्यामध्ये पदव्युत्तर होऊ शकतो..प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून योग्य नियोजित पद्धतीने अभ्यास कसा करावा हे भुरातून आपल्याला शिकायला मिळतो.वाचकाने कधीही विचार न केलेल्या बाबी भुरा मध्ये वाचायला मिळतात.देश आणि विदेशातील विद्यापीठातील भुराला आलेले अनुभव वाचणे हा एक वेगळ्याच विश्वात नेणारा अनुभव वाचकांसाठी ठरतो एवढं खरं.
तर एकंदरीत भुरामध्ये सर्वकाही आहे.संघर्ष,प्रेरणा,समाजातील वास्तव,जातीय वाद,प्रेम, राजकारण, मित्रता,संस्कृती, प्रवास वर्णन,धार्मिकता,समाजकारण,आईचे प्रेम,गरिबी,शिक्षण,भेदभाव,आधुनिकीकरण आणि कमालीचं तत्वज्ञान व इतर बरंच काही...
शेवटी,
भुरा मध्येच लिहल्याप्रमाणे एका फ्रेंच तत्वज्ञानुसार,
ही "पहिली माणसं'असतात ज्यांची सुरुवात अक्षरशः शून्यापासून होत असते.
आणि हा वाक्य भुरावर तंतोतंत घट्ट फिट बसतो एवढं नक्की.
© Moin K
टिप्पणी पोस्ट करा