गुल्लक: निखळ आनंदाची पिगी बँक
हिंदीतील गुल्लक म्हणजे इंग्रजीत पिगी बँक. देशभराप्रमाणेच महाराष्ट्रातही घरोघरी, पिढ्यानपिढ्या वापरली जाणारी ही वस्तू. पण या वस्तूला मराठी भाषेत विशिष्ट नाव नसावे ही खेदाची बाब आहे. गुल्लक किंवा पिगी बँक; ज्यामध्ये बालपणी खाऊचे वाचविलेली चिल्लर साठविली जाई. सणासुदीला नातेवाईकांकडून भेट मिळालेली एखादी रुपया, दोन रुपयाची नोट साठविली जाई. अधूनमधून ती गुल्लक कानाजवळ वाजवून त्यात किती पैसे जमले असावेत ह्याचा अंदाज लावला जाई. या गुल्लकमध्ये केवळ पैसेच नव्हे तर या जमलेल्या पैशाचे काय काय करायचे त्याच्या कल्पना, योजना आणि स्वप्ने साठविली जात. अशा या, आईच्या पदरा खालोखाल भावनिक मूल्य असणाऱ्या वस्तूला 'पैसे साठविण्याचा डबा किंवा पैशाचे भांडे" असे रुक्ष नाव आपल्या सारखे दगडाच्या देशातील लोकच देऊ शकतात.
कधी कधी कुटुंबावर आलेल्या आर्थिक संकटात या गुल्लकमधील पैशांनी कसा हात दिला ह्याच्या भावनोत्कट कहाण्या जवळजवळ प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाकडे ऐकावयास मिळतील. एकेकाळी संपूर्ण कुटुंबाचे वर्षभराचे उत्पन्न नव्हतं तितके पैसे प्राथमिक शाळेतील मुलाला पॉकेट मनी म्हणून दिले जाण्याच्या आजच्या काळातही जे लोक आपल्या मुलांनी पिगी बँकेत पैसे साठवावेत असा आग्रह धरतात त्यात मुलांना पैसे साठविण्याची सवय लागावी यापेक्षा ज्या वस्तूशी आपल्या बालपणीच्या कित्येक कडूगोड आठवणी जुडलेल्या आहेत ती गुल्लक नावाची वस्तू आणि तो सकळ नॉस्टॅलजियाच आपल्या नजरे समोर राहावा, त्यातून एक आशेची उब मिळत राहावी हा उद्देश असण्याची शक्यताच जास्त असावी. असो.
२०१९ मध्ये ‘सोनी-लिव’वर ‘गुल्लक’ नावाची एक वेबसिरीज आली होती. उत्तर भारतातील एक छोटं शहर. त्या शहरात राहणारं मध्यमवर्गीय मिश्रा कुटुंब. त्यांच्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्यामोठ्या किस्सेवजा घटना या भोवती 'गुल्लक'ची कथा फिरत असते. 'गुल्लक'च्या दृष्टिकोनातून आणि निवेदनातून हे एकेक किस्से आपल्यासमोर सादर होतात आणि आपल्याला त्यात गुंगवून ठेवतात. २०२१ मधे गुल्लक चा दुसरा सीजन आला त्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळला आणि आता आलेला तिसरा सिजनही तितकाच उत्तम झालेला आहे. या आधीचे दोन सीजन मिश्रा कुटुंबाने आपल्याला केवळ हसविण्याचं काम केलंय, तिसऱ्या सीजन मधे मात्र ते प्रेक्षकाला थोडंसं भावुक देखील करतात त्यामुळे कथेचा परिणाम अधिक गडद होतो.
मिश्रा कुटुंब हे एक असं मध्यमवर्गीय कुटुंब आहे की जे विजेचं बिल वाढू नये म्हणून एसीचं तापमान कमी करायला मागेपुढे करतात, ज्या आईवडिलांना आपल्या मुलाकडून त्याच्या पहिल्या पगारातील पैसे मागायला संकोच वाटतो, जे केवळ लोक काय म्हणतील म्हणून आपल्या स्कुल टॉपर मुलाला त्याच्या इच्छेविरुद्द सायन्सला ऍडमिशन घेतात. जिथे थोरला भाऊ आपल्या धाकट्या भावाच्या फी साठी आपल्या पहिल्या पगाराची कुर्बानी देतो. . . .
या मिश्रा कुटुंबात कुठल्याही मोठ्या घटना घडत नाहीत. कथेत फारसे ट्विस्ट-टर्न्स नाहीत. पुढे काय होणार याबद्दलची उत्कंठा लागून राहत नाही. खो-खो हसण्यासारखं किंवा डोळ्यांत पाणी येण्यासारखं कथेत काहीच नाही. पण हे कुटुंब, त्यातील सदस्य, त्यांच्या समस्या, त्यांच्यातील रुसवे-फुगवे आपले वाटणे. आपल्या आतल्याआत गुदगुल्या होत राहणे आणि संपूर्ण सीरिजभर आपल्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य टिकूवून ठेवणे हेच या सिरीजचं यश म्हणावं लागेल. त्याला जोड मिळालीय साधीसरळ पटकथा-संवाद, विषयाची हलकीफुलकी हाताळणी अधोरेखित करणारं पार्श्वसंगीत, आणि गुणगुणावंसं वाटेल असं टायटल गीत ह्यांची.
या मिश्रा कुटुंबाला पाहिल्यावर आपल्याला आपलं बालपण आठवल्यावाचून राहत नाही. प्रत्येक पात्र आणि प्रत्येक प्रसंग आपल्या वास्तविक आयुष्यात आपण कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतो. गीतांजली कुलकर्णीनी साकारलेली भावुक, प्रेमळ तरीही खमकी आई, जमील खानचा अत्यंत साधा-सरळ मध्यममार्गी वीज मंडळात कारकून असलेला बाप; संतोष मिश्रा, आधी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा, मग राजकीय नेत्याच्या वशिल्याने व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न करणारा आणि आता मेडिकल रिप्रेसेंटेटिव्ह बनून आपल्या वडिलांना संसारात हातभार लावणारा हिकमती थोरला मुलगा अन्नू, वैभव राज गुप्ताने जिवंत केलाय. तिसऱ्या सीजन मधे वैभव राज गुप्ताने, अन्नूच्या तारुण्यसुलभ बेफिकीर वागण्यापासून कुटुंबातील जबाबदार घटक होण्यापर्यंतचा प्रवास आपल्या संवादफेकीतून, देहबोलीतून आणि डोळ्यांतून अतिशय प्रभावीपणे दाखविला आहे. आपल्या थोरल्या भावासोबत ज्याचं जमत नाही आणि त्याच्याशिवाय ज्याला करमतही नाही अशा हॅप्पी-गो-लकी धाकट्या भावाच्या (अमन) भूमिकेत हर्ष मायरने कमाल काम केलंय. सुनीता राजवरने साकारलेली बिट्टू की मम्मी म्हणजे चेरी ऑन दि केक.
पहिल्या दोन सीजन इतकाच जमून आलेला गुल्लकचा तिसरा सीजन देखील चुकवू नये असाच आहे. इंडियन ओटीटीवर कुटुंबासह पाहण्यासारख्या खूप कमी वेबसिरीज आहेत. माझ्या मते गुल्लक ही कुटुंबासह पाहता येणाऱ्या वेबसिरीज पैकी सर्वात उत्तम वेबसिरीज आहे.
*सॅबी परेरा*
तळटीप: मी वेबसिरीज, सिनेमा किंवा नाटकांचे समीक्षण लिहीत नाही. माझा या माध्यमांचा तितका अभ्यास नाही आणि समीक्षण लिहिण्याचा वकूबही नाही. मी केवळ मला आवडलेली कलाकृती आणि त्या विषयाच्या निमित्ताने माझ्या मनात आलेले विचार माझ्या मित्रवर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी परिचयात्मक लिहितो
टिप्पणी पोस्ट करा