FINDRI marathi book | मराठी पुस्तक फिन्द्री-सुनीता बोर्डे
FINDRI marathi book | मराठी पुस्तक फिन्द्री-सुनीता बोर्डे |
सुनीता बोर्डे ताई लिखित 'फिन्द्री' ही कादंबरी वाचली नव्हे तर अनुभवली.एकंदरीत ही अप्रतिम अशी कादंबरी मी जगून आलो आणि सध्या सुद्धा या कादंबरीच्याच सानिध्यात वावरतोय.किमान एक आठवडा तरी लागेल मला यातून बाहेर येण्यासाठी.
या प्रवासाने मी समृद्ध झालो,अंतमूर्ख झालो.खूप काही शिकुन तर कितीतरी प्रेरणा घेऊन आलो.फिन्द्रीतील संगीताच्या आईचे म्हणजेच 'मिरुआई'चे बोट धरून स्त्रीचं दुःख जाणून घेत असतानाच प्रचंड महत्वाचा तत्वज्ञान शिकून आलो.या प्रवासात मी पुर्णपणे हरवून गेलो,यामध्ये मला पावलोपावली बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे विचार अनुभवायला मिळाले.यातून कितीतरी पटीने ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली ती शब्दांत मुळीच सांगता येणारी नाही.या प्रवासाने मला पावलोपावली रडवलं,एकंदरीत अंतर्मुख करून आतून विचार करायला भाग पाडलं.जिद्द,मेहनत,इच्छाशक्ती,संघर्ष इत्यादी शब्दाची व्याख्या मला 'मिरुआई' आणि 'संगीच्या' आयुष्याचा खडतर प्रवास वाचून समजली.
प्रचंड म्हणजे प्रचंड आवडली ही कादंबरी.लेखिकेने ज्याप्रमाणे एका नकोशी असलेल्या मुलीची आणि त्याची आईची दुःख आणि संघर्षपूर्ण असलेली गाथा या कादंबरीतून वाचकांसमोर मांडली आहे, त्याला खरंच तोड नाही.कुठल्याही अलंकारिक भाषेचा वापर न करता,एकदम सोप्या आणि साध्या भाषेत लिहली गेलेली ही कादंबरी वाचकांवर एक प्रकारची मोहिनी पाडते. सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत एकाच ठिकाणी खिळवत ठेवणाऱ्या या कादंबरीची खासियत आहे,तिची मांडणी.लेखिकेला जे काही सांगायचं-मांडायचं होतं ते उद्देश त्यांनी खूपच चांगल्या पद्धतीने साध्य केलं आहे.
समस्त स्त्री जातींची सत्य व्यथा आणि कैफियत आपल्याला पावलोपावली यातून वाचायला मिळते.स्त्री जीवनातील खूपच बारीक सारीक निरीक्षणे यामध्ये केली आहे.पणजी, आजी, आई आणि मुलगी अशा हरएक पिढीतील स्त्रीच्या वाट्याला आलेल्या 'फिन्द्रीपणा'च्या वाटा उलगडून दाखवणारी ही एक आगळीवेळी कादंबरी आहे.जी प्रत्येकाने वाचायलाच हवी.
बालविवाह, स्त्रीभ्रूणहत्या,अस्पृश्यता
जातीयवाद,घरगुती हिंसाचार इत्यादी कितीतरी गोष्टींवर लेखिकांनी खूपच प्रखडपणे भाष्य केले आहे,जे वाचताना अंगावर काटा येतो. यातील कितीतरी प्रसंग वाचताना डोळे पाणावतात,तर काही प्रसंग वाचत असताना प्रचंड ऊर्जा मिळते.प्रत्येक पानात आयुष्यातील छोट्या मोठ्या गोष्टींना जोडून दिलेले जीवना संबंधित असलेले तत्वज्ञान वाचकाला विचार करायला भाग पाडतात,उभारी देतात.मी आजपर्यंत असंख्य वेगवेगळ्या कादंबरी आणि पुस्तकातील पात्रांच्या प्रेमात पडत आलो आणि त्या पात्राकडून खूप काही नवीन शिकत आलोय.काहीतरी चांगलं शिकणे आणि ते पात्र अनुभवणे मला नेहमीच महत्वाचं वाटतं.या कादंबरीतील मी दोन पात्रांच्या प्रेमात बुडालोय. ही दोन पात्र म्हणजे, 'संगी' आणि तिची 'आई'.मिरुआईने मला याठिकाणी 'भुराच्या' आईची आठवण करून दिली तर एका आई पेक्षा महत्वाचं भारी तत्वज्ञान दुसरं कोणीही देऊ शकत नाही हे मला पटवून दिलं.यातून मला एक वेगळा दृष्टीकोन मिळाला,आजूबाजूला डोळसपणे बघण्याची दृष्टी मिळाली.एकूणच या कादंबरीतून मला खूप काही मिळालं,या कादंबरीने मला खूप काही नवीन दिलं एवढं नक्की.
रणधीर शिंदे सर म्हणतात :-
आई आणि मुलीचा जीवनसंघर्ष असणाऱ्या या कादंबरीतील समाजचित्रणास जात पुरुषसत्तासंबंधाचे बहूल असे संदर्भ आहेत,बाईचा जन्म म्हणजे 'इघीन' आणि 'काटेरी बाभूळबन' असणाऱ्या समाजातील बाईपणाच्या दुःखशोषणाचा कहाणीप्रदेश या कादंबरीतून साकारला आहे. जात, धर्म, पितृसत्ता, लिंगभावाच्या दमनाबरोबर आधुनिक स्त्रीच्या संघर्षकर्तृत्वाची सुफळ कहाणी या कादंबरीतून साकार झाली आहे. पराकोटीचा अभाव, दुःखशोषण, सहनशीलतेबरोबर आत्मसन्मान आणि श्रेयसाची वाट वर्धमान करणाऱ्या आधुनिक स्त्रीची ही एक व्यथाकहाणी आहे. आर्थिक परावलंबन आणि जात- पुरुषदमण पार्श्वभूमीवर 'शिक्षणशहाणपण' हा स्त्रियांच्या दुःखमुक्तीचा अवकाश आहे ,याचे विवेकी भान देणारी ही कथनदृष्टी आहे. कादंबरीतील दलित समाजजीवनशैलीच्या तपशीलभरणाने समूहचित्रणाची कक्षा विस्तारली आहे .तसेच आंबेडकरी व स्त्रीवादी विचारव्यूहांच्या दृष्टीने समाजसत्तासंबंध न्याहाळण्याची दृष्टी कादंबरीतून व्यक्त झाली आहे. सुनीता बोर्डे यांची कथनशैली ही गोष्टीवेल्हाळ आहे. आत्मपरता आणि समूहरीतीच्या वास्तव कल्पाविष्काराची बेमालूम सरमिसळण या कथनरूपात आहे. या रूपबंधास स्थळ , प्रदेश, व्यक्ती तसेच घटनाप्रसंगांच्या मनोहारी गुंफणीतून ललितशैलीची अनोखी परिमाणे लाभली आहेत. स्त्री दुःखशोषणाची जाण आणि अस्मिताभानाचा खोलवरचा प्रत्यय देणारी ही कादंबरी महत्त्वाची ठरते.”
सरांनी कादंबरीबद्दल लिहलेलं वरील आशय हाच फार नेमकं आणि महत्वपूर्ण आहे.त्यामुळे येथे कथेबद्दल जास्त काही लिहीत नाही.फक्त एवढंच सांगेन की ,संगीता नामक बापाला नकोशी असलेल्या मुलींची आणि तिच्या आईची ही एक संघर्ष आणि दुःखाने भरलेली एक हृदय पिळवून टाकणारी कथा आहे.जी प्रत्येक वाचकाने वाचून अनुभवायला हवी.प्रत्येक वाचकाने संगीच्या आईचं बोट धरून त्यांच्या आयुष्यातील प्रवासाचा एक भाग व्हायला हवा.आणि जगातील महत्वपूर्ण तत्वज्ञान कादंबरीतील या पात्रांच्या आयुष्यातील महत्वपूर्ण घडामोडीतून शिकुन घ्यायला हवं असं मला वाटतं.🖤
मला आवडलेले व डोळ्यात अंजन घालणारे कादंबरीतील काही विचार...🌿♥️
1)भुकेपोटी माणूस लाचार व्हतो बाई. माणसाच्या पोटालानिसती भाकर मिळून नही चालत, बाई. त्याच्या मनाला मायाबी लागाती.
2)नदी अन् विहिरीचं आटलेलं पाणी गावातल्या बायांच्या डोळ्यांत तर साठलं नसेल ना? खरंच, बायकांच्या डोळ्यांतल्या पाण्याने जर तहान भागवता आली असती, तर आमच्या गावातच काय अख्ख्या मराठवाड्यातही कधी पाण्याचा दुष्काळ पडला नसता!
3)'मृत्युंजय'मधल्या कर्णाला जशी जन्मतःच कवच-कुंडलं मिळालेली होती का नाही, तशी आपल्याला ही पुस्तकरूपी कवच-कुंडलं मिळालेली असतात; फक्त आपल्याला त्यांची ताकद लक्षात येत नाही. तू चांगला अभ्यास कर, जेव्हा जेव्हा मन खूप उदास होत जाईल तेव्हा हे अवांतर वाचन करत जा. वाचण्यात मन रमलं, का आपोआप माणूस जगण्यात रमतो हे लक्षात ठेव!'
4)सुखाच्या वक्ताला नही राहयलं तरी चालातं; पण कोणाच्याबी वक्ट्या वक्ताला मातर त्याच्या सोबत उभं राहावा! येळ कधी दवंडी देऊन येत नसतीय, अन् जातांनाबी कोणाला सांगून जात नसतीय.
5)माणसाचं जीवनही एखाद्या गोधडीसारखंच असतं नाही? आनंद, दुःख, राग, द्विधा, आशा, निराशा, अशा कितीतरी भावभावनांच्या चिंदकांचं पुरण तिच्यात भरलेलं असतं. त्यावर माणूस आनंदाच्या मुखवट्याचं अस्तर लावून चारी बाजूंनी त्या गोधडीचे काठ शिवून घेतो. एकही चिरगुट कुणाला दिसू नये म्हणून धडपडत, पुढ आयुष्यभर त्या गोधडीवर काळाच्या सुईनं पेक्षांचा एक एक चौकोन पूर्ण करत असतो.
6)जीवनात अंधार जितका जास्त, तितकी जास्त स्वप्नं पाहावी; म्हणजे तितकाच जास्त या स्वप्न-काजव्यांचा उजेड दिसेल.
7) द्वेष अगदी सहज पचवणाऱ्या माणसाच्या मनाला सहानुभूती कशी काय इतक्या सहज हळवं करत असेल बरं?
8)आपल्याशी वाईट वागणाऱ्या माणसाशी चांगलं वागूनच आपण त्याला जिंकू शकतो.
9)माणसांच्या जातीपेक्षा शब्दांच्या जाती वेगळ्याच असतात! माणसं जशी जातीवरून भांडतात, तसे शब्द भांडत नाहीत. माणसासारखा शब्दांना एकमेकांचा बाट होत नाही, शब्दांच्या जाती-जाती जातीवरून दंगे होत नाहीत. उलट, एका रांगेत एकमेकांच्या शेजारी बसून , वाक्याला अर्थ देतात. अशीच बाक्यं जीवनाला अर्थ देतात! माणसांच्या जातीपेक्षा शब्दांच्या जाती खरंच शहाण्या असतात!
10)आगं, आसं चिखलाला घाबरून घरी जाऊन चालंल का ? दमलं म्हणून काय चिखलात बसता थोडचं येत आसतंय? मंग जव्हा चिखलात बसता येत नही, तव्हा चालत राहण्यातच शहानपण आसतंय बाई! चिखलाची वाट संपली का पुढं डांबरी सडकहे नाऽ! तिढलोक पोचायचं, म्हणजी हा चिखल तुडवावाच लागण ना बाईऽ! संगु, जिनगानीत असाच दुखाचा चिखल तुडवावा लागत आसतोय, तवा कुढं सुखाची डांबरी सडक सापडातीय! अशा चिखलाला घाबरून जर आपुन वापीस गेलो ना, मंग काय, हाये तिढंच राहातो! म्हणून ध्यानात ठिव, कितीबी चिखल लागू दी, त्या चिखलाला अज्जिबात घाबरायचं नही; उलट, त्याला तुडवून का व्हईना, वाट चालायची.
©️Moin Humanist🌿
टिप्पणी पोस्ट करा