ऍनिमल मूवी रिव्हिव्ह मराठी |Animal Movie Review In Marathi


Animal Movie Review In Marathi

Animal Movie Review In Marathi


संदीप वांगा रेड्डी पहिलं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तो टेक्निकली खूपच परफेक्ट आहे.त्याला पटकथेसोबतच ईडिटिंग ,साऊंड डिझाईनची खूप जास्त जाण आहे.अर्जुन रेड्डीतल्या टेक्निकल डिटेलिंगबद्दल युट्युबवर स्वतंत्र व्हिडिओही उपलब्ध आहे तो पाहिल्यावर तो किती जिनियस आहे हे कळून येईल.एनिमलमधल्या साऊंडसाठी कौतुक केलं तितकं कमीच आहे.इथं जवळपास प्रत्येक सीनला पार्श्वसंगीत आहे पण ते अडथळा ठरत नाही.केजीएफ 2 पेक्षाही हे संगीत अँक्शन प्रसंगांना अव्वल वाटतं.दुसरं वैशिष्टय म्हणजे संदीप रेड्डींचा अँटी हिरो आणि सामाजिक चौकटींना न मानणारे पण तरीही नातेसंबंधांना महत्व देणारे पात्र.त्यांच्या ईच्छा, महत्त्वांकाक्षा बऱ्याच अंशी समर्थनीय असल्या तरी त्यांचा मार्ग चुकीचा असतो व ते हे मान्य करत नाहीत.समाजात अशी अनेक पात्रे आढळतात पण सदरील चित्रपटात ही पात्रे पशूच्या पातळीवर जातात.चित्रपटाचं टायटल आपल्याला व्यवस्थित समजलं नाही तर चित्रपटही कळणार नाही.
चित्रपटातलं मुख्य पात्र (रणबीर कपूर ) व एक व्हिलनचं पात्र ( बॉबी देऑल ) हे दोघेही एकाप्रकारचे जनावरच आहेत.कारण ते फक्त ईमोशनल इंस्टिंक्टवर जगत राहतात.यासाठी पडेल ती किंमत मोजायला ते तयार होतात.त्यांच्यासाठी कायदा ,सामाजिक चौकट ,पारंपरिक रूढी ,रितीरिवाज या गोष्टी अर्थहीन आहेत. विशेषतः रणबीर कपूरचं पात्र रणविजय हे वडिलांशी अतिशय प्रेम करणारं आहे पण त्याचं प्रेम ऑब्सेसिव्ह आहे.त्या प्रेमात तो पार आंधळा आहे असं म्हटलं तरी चालेल.त्याचं वडिलांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणं हे फक्त त्याचं वडिलांवरचं प्रेम सिद्ध करणं नाही तर त्याद्वारे स्वतःलाही सिद्ध करणं आहे.हे पात्र इतकं हट्टी आहे की आपल्या प्रत्येक गोष्टीचं मग ते बरोबर असो वा चूक स्पष्टीकरण त्याच्याकडे आहे.मग ते खरं मानायचं का खोटं अतार्किक ,अवास्तववादी हे तुमच्या नैतिक संस्कार ,समजेवर आधारित आहे.
चित्रपटात काही बारीक सारीक गोष्टी अर्जून रेड्डी, कबीर सिंगमधल्या रिपीट झालेल्या दिसतात.चित्रपट हॉलिवूडचे गँगस्टर ,स्लँशर फिल्म्स ज्यात हिंसा प्रचंड असते ,ज्यात बरेच अँक्शनचे सीन्स अतार्किक पातळीपर्यंत पोहोचतात असे चित्रपट आवडणाऱ्यांसाठी हा एक्शन - फॅमिली ड्रामा चित्रपट आहे.ज्यांना धार्मिक ,राजश्री प्रॉडक्शन ,धर्मा प्रॉडक्शन किंवा यशराजचे कौटुंबिक चित्रपट आवडतात त्यांचा कदाचित हिरमोड होऊ शकेल.जर तुम्हाला 'स्कारफेस' आवडत असेल किंवा तत्सम अँटी हिरो वा खलनायकी पात्र मुख्य भूमिकेत असणारे , मार्टिन स्कॉर्सिझी ,सर्जिओ लिओने ,क्वेंटिन टँरंटिनोचे चित्रपट आवडत असतील तर हा चित्रपट खास तुमच्यासाठीच आहे.चित्रपटातील टेक्निकल बाबी इतक्या अप्रतिम आहेत की त्यांचा आनंद फक्त थिएटरमध्येच येऊ शकतो.तो मोबाईल किंवा लॅपटॉपवर येणार नाही.
चित्रपटाची कथा ,पटकथा छान जमली आहे.सर्वच पात्रांचा विशेषतः रणबीर कपूर ,बॉबी देऑल ,अनिल कपूर यांचा अभिनय छानपैकी जमलाय.संगीतही उत्तम आहे.मध्यांतरापर्यंत चित्रपट खिळवून ठेवतो.मध्यंतरानंतर चित्रपटावरची पकड लांबीमुळे थोडीशी ढिली होत असली तरी बॉबी देऑलमुळे ती बरीचशी सावरली जाते.तृप्ती दिमरीचा अभिनयही मस्त जमलाय.रश्मिका मंदानाही बरी वाटते.चित्रपटात इंग्लिश व पंजाबी संवाद बरेच आहेत.मधे एक सरप्राईज आहे मराठी प्रेक्षकांसाठी ते इथं सांगत नाही.'हुआ मै' ,'सतरंगा' ,'पापा मेरी जान' ही गाणी श्रवणीय आहेत पण 'अर्जन वेल्ली' हे ब्रिटिशांशी लढणाऱ्या महाराजा रणजित सिंह यांचे सेनापती हरीसिंग नालवा यांचा मुलगा अर्जन सिंग यांच्या शौर्यगाथेवर आधारित लोकगीत अंगावर शहारे आणतं.तो चित्रपटाचा जीव आहे असं म्हटलं तरी चालतं.व्हिसलची थीम बीजीएम पण सुरेख व मोक्याच्या ठिकाणी वाजते.कथेतील पंजाबी वातावरणामुळे चित्रपटाशी जुळवून घेण्यात जर तुम्हाला लेफ्ट आऊट फिल होत असेल तर मराठी प्रेक्षकांसाठीचं वर मी उल्लेखिलेलं सरप्राईज एक मोठा दिलासा आहे.
अर्जुन रेड्डी ,कबीर सिंगवर बऱ्यापैकी मिसॉजिनिस्ट ,महिलांचं अस्तित्व नाकारणारा ,प्रतिगामी ,बुरसटलेल्या - मागास विचारांचा नायक अशी टिका झाली होती.यावरही होत आहे. पण शेवटी ही डॉक्युमेंटरी नाही कमर्शियल चित्रपट आहे हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे.परदेशी याच्यापेक्षा टुकार असणारे चित्रपट आपण चवीने बघतो पण आपले संस्कार ,आदर्श उच्च असणाऱ्या देशात अगदी A प्रमाणपत्र ( फक्त प्रौढांसाठी 18+) सेन्सॉर बोर्डाने देऊनही असे चित्रपट कुणी बघू नये किंवा बनवू नये असं अनेकांना वाटतं पण जर समाजाच्या आवडीनिवडी बदलत असतील किंवा प्रेक्षक म्हणून समाजाची अभिरूची समृद्ध होत असेल तर असे चित्रपट बनायला मुळीच हरकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे.चित्रपटातला नायक बऱ्याच ठिकाणी आपली स्त्रीवादी मते मांडतो.तो आदिम काळातील व सध्याच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून व काहीशा प्रतिगामी दृष्टिकोनातून आपली मते मांडतो त्यामुळे तो अर्जुन रेड्डी वा कबीर सिंगपेक्षा किंचित उजवा व परिपक्व वैचारिक बैठक असणारा वाटतो.त्याची बाजू थोडी स्पष्टपणे कळू शकते संदीप रेड्डींच्या पूर्वीच्या चित्रपटातील पात्रांपेक्षा.पण त्याचं व्यक्त होणं हे जनावरासारखंच आहे.
प्राण्यांमध्ये जे स्वाभाविक गुण असतात जसं बऱ्याच खाजगी गोष्टी अनेकदा इतरांसमोर उघडपणे करणे ,कसलाही आडपडदा न ठेवणे ,परिणामाची चिंता न करता फक्त आपल्या नैसर्गिक ईच्छेला प्रमाण मानून कृती करणं हे यातल्या पात्रात आहे.प्राणी जसं कळपात राहतात ,कळपाचा कायदा मानतात तसंच तो आपल्या समूहालाच सर्वस्व मानतो.त्यांना कुणी धक्का लावलेलं वा त्यांची शिकार केलेलं त्याला आवडत नाही तो त्याचा सूड उगवतो.आपल्या कुटुंबाचा तो कर्ता पुरूष आहे.प्राण्यांमध्येही ज्याप्रकारे नर असण्याचा लैंगिक अभिमान ,सुप्रीमसी असते तशीच या पात्रातही आहे पण त्यामुळे तो थेट अत्याचारी पुरूष बनत नाही.तो पत्नीसोबत ज्या गोष्टी करतो त्याच परत तिच्याकडून मिळाल्यावरही नाकारत नाही.त्याच्यासाठी प्रेम महत्त्वाचं आहे.प्रेमातलं गिव्ह अँड टेक त्याला मान्य आहे.स्कारफेसमधल्या टोनी मोंतानासारखं तो आपल्या चुकांमुळे सामाजिकदृष्ट्या खचत जातो पण आपलं खचणं ,आपल्या चुका स्वीकारणं त्याला मान्य नाही.लहानपणी वडिलांकडून त्याला मिळालेली गॅसलायटिंग ,मारहाण जी आपल्याकडे अनेक संस्कारी म्हणवल्या जाणाऱ्या दुसऱ्या कुटुंबात पालक आपल्या मुलांना देतात याचाही हात तो मानसिकदृष्ट्या आहे त्या ठिकाणी तिथं पोहोचण्यात आहे.
चित्रपटाचं दिग्दर्शन उत्तम आहे ,एक्शनही जबरदस्त.सौरभ गुप्ताचे संवाद खूपच तगडे आहेत. रणविजयच्या पात्राला न्याय या संवादातून मिळतो.संगीत,गीत ,अभिनय ,सिनेमॅटोग्राफी सर्वच बाबी छानपैकी जमून आल्यात.काही प्रसंग कायमचे मनावर कोरले जातात.जसे रणबीर कपूरचा वडिलांसोबतचा शेवटचा प्रसंग ,तसेच सुरूवातीलाच त्याचा पहिल्या सीनचा प्रसंग अतिशय उत्तम.रणवीर कपूरचं आता कमबॅक झालं असं म्हणायला कसलीच हरकत नाही.त्यासोबतच ज्याप्रकारे बॉबी देऑलने समर्थपणे आपली भूमिका निभावली त्यायोगे त्याचंही कमबॅक झालंय असं म्हणायला हरकत नाही.तो खराखुरा बिस्ट मोडमध्ये पडद्यावर आपल्या भूमिकेत अवतरतो.बाकी मी ज्या थिएटरमध्ये चित्रपट बघत होतो तिथं लोकं एकाच वेळी शॉकिंग असण्यासोबतच हसतही होते व उत्स्फूर्तपणे मजा घेत होते.यात पुरूषांपेक्षा महिलांचाच सहभाग जास्त होता त्यामुळे कुठुनही चित्रपट वाईट आहे अशी प्रतिक्रिया बघायला भेटली नाही.आपल्याकडे परदेशातून आयात केलेला आयता सूडो फेमिनिझम दाखवणाऱ्या 'फोर मोअर शॉट्स' सारख्या भडक उथळ वेबसिरीज, चित्रपट येतात व त्यांना कसल्याही जजमेंटशिवाय चांगला प्रतिसाद मिळतो तेव्हा याच चित्रपटावर 'टॉक्सिक मस्क्युलिनिटी' वगैरे वगैरे टीका करणं योग्य नाही.दोन बाजू नाण्याच्या कायम असतात भारतासारख्या कमालीचं ध्रुवीकरण झालेल्या देशात आणि राहतील ,किएटिव्ह लिबर्टी कलाकाराला असतेच व असावी.त्याशिवाय प्रेक्षकांना निवडीचे स्वातंत्र्य व बरेचसे उपाय कसे राहतील.बाकी चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा.एंड्स क्रेडिटपर्यंत बघा ,कारण सेकंड पार्टही येणार आहे. त्याची एक मस्त झलकही यात बघायला मिळते.ज्यात रणबीरचा अवतार अतिशय खतरनाक आहे.त्यासोबतच लहान मुलांना किंवा हिंसा सहन न होणाऱ्या व्यक्तींना सोबत नेणे टाळा ! अश्याच चित्रपटाचे मराठी रिव्हिव्ह वाचण्यासाठी खासमराठी movies ला भेट द्या ...
- ऋषिकेश तेलंगे
#animal

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने