कसा आहे छावा मुव्ही मराठी । रिव्हिव्ह ।chhava movie Marathi review download
![]() |
|
श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।I
संभाजी महाराज कसे होते??मावळे कसे लढले असतील ?? विकी कौशल का घेतला??? रश्मीका मंदना ऐवजी मराठी अभिनेत्री घ्यायला हवी होती का? अस काहीही वाटलं तरी छावा बघायचाच आणि थिएटरमध्ये जाऊनच बघायचा, सहकुटुंब जाऊन बघाच. संभाजी महाराजांनी आजवर केलेल्या लढायांचा आढावा घ्यायचा असेल तर छावा बघितलाच पाहिजे. रणधुरंधर राजा पहायचा असेल तर छावा बघाच. मराठ्यांची मानसिकता, राजाची प्रजा, येसूबाई पाहायच्या असतील तर छावा बघाच. प्रत्येकवेळी 'च' लावतीये कारण अनेक कारणाने आलेलं सिनेमाच दडपण या चित्रपटाने लांब पळवून लावल. उरी बघून मला विकी आवडलेला पण यात तो 'राजे' म्हणूनच जगला आहे. आयाळ असलेला सिंह वाटावा असा, भेदक नजरेचा, तो बोलतो का डरकाळी फोडतो हेच समजतं नाही. तलवार तर अशी चालवतो, तलवारच नाही तर दांडपट्टा, धोप, ढाल, जांबिया, कट्यार आणि घोडा सुद्धा, ज्याप्रकारे त्याने काम केल आहे त्यानंतर तुम्ही राजेच म्हणाल. सह्याद्रीतल्या उन्हात रापलेला, कणखर, रुद्राचा अवतार असलेला हा राजा त्याच्या सखी राज्ञी पुढे मात्र अतिशय मृदू आणि कुटुंबवत्सल कर्ता पुरुष म्हणून उभा रहातो.
रश्मीका टिपिकल राजघराण्यातील घरंदाज स्त्री वाटते. तीच ते गोंद लावून लावलेलं कुंकू, नाकातली ठसठशीत नथ आणि तिच्या जिजामाता काठाच्या बारीक किनारीच्या जरीच्या साड्या, पैठण्या, गळ्यातल्या पुतळ्याच्या माळा, डोकझाकून घेतलेला अंगभर पदर, प्रचंड बारीक काम केलंय. राणी म्हणून तोऱ्यात मिरवण्यापेक्षा घरातील जबाबदार थोरल्या राणीनंसारखी स्वराज्य सांभाळते.
अक्षय खन्नाची बेरकी नजर आणि त्याचा बदलणाऱ्या वर्षाबरोबर बदलणारा मेकअप त्याच वार्धाक्य दाखवते, त्याचा पेहेराव सगळ अप टू द मार्क. आशुतोष राणा हंबीरराव मोहिते म्हणून आणि प्रदीप रावत येसाजी कंक म्हणून देखणे दिसले आहेत कामही कमाल आहे. राजें नंतर सगळ्यात आवडलेली कास्ट म्हणजे कवी भूषण म्हणून घेतलेला अतिशय गुणी कलाकार विनीतकुमार सिंग. संतोष जुवेकर या गुणी मराठी अभिनेत्याने दमदार मावळा केला आहे, त्यासाठी घेतलेली मेहेनत पहिल्या बुऱ्हाणपूरच्या लढाईतच दिसते. सारंग साठे आणि सुहृद जोशी चवी पुरते वापरले आहेत, पण काम आहे त्यांना. शिवराज वाळवेकर बहिर्जी म्हणून लक्षात राहतात.
संभाजी महाराजांवर अनेक नाटक, सिनेमे आले. पुस्तक वाचली 'छावा' त्यात प्रथम स्थानी. त्यात सुरवातीला teaser आलं आणि गाण्यात लेझीम खेळणारे राजे बघून अनेकांनी आक्षेप घेतला. पण 'नरसिंह' गाणं आलं आणि आशा उंचावल्या. पहिल्या शो ची तिकीट काढून हा चित्रपट बघायचाच. परत कशावर आक्षेप घेतील सांगता येत नाही.
आचार्य अत्रे यांनी शिवाजी सावंताना एका सत्कार समारंभात म्हंटलेले 'शिवाजीराव संभाजी महाराजांवर लिहिताय पण खबरदार छ. शिवाजी महाराजांपुढे वरचढ झाले तर...' यावर शिवाजी सावंतांनी दिलेलं उत्तर होत ' माझ्या कादंबरीच मी विचारपूर्वक नाव ठेवलं आहे 'छावा' नावातच त्याचे पिताजी छ. शिवराय हे ' नरसिंह' होते हे व्यक्त होत नाही का?? बाकी चित्रपट उत्तम झाला आहे. चित्रपटाच संगीत श्रवणीय असलं तरी 'नरसिंह' आणि संभाजी महाराजांच्या अग्नी करता केलेलं music जास्त भारी आहे इतर बॅकग्राऊंड पेक्षा. संगीता करता मराठी संगीतकार चालले असते. पण द रेहेमान सर इथे मात्र ठीक वाटले. लक्ष्मण सर तुमच आजवरच सगळ्यात आवडलेलं काम आहे हे आणि थोरल्या राजांच्या आवाज पण जमून आलाय. शक्य तेवढा natural light वापरला आहे.तुमच्या आवाजात एक वजन आहे. शेवटचे अनेक सीन अंगावर येतात, खूप खूप खूप रडायला येत. काहीच म्हणावंसं वाटतं नाही शेवटी, थिएटरमधून अतिशय सुन्न होऊन बाहेर पडतो.
इतिहासाच्या चुका असतील, पण त्यांनी उगाच सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन माती खाऊपणा नाही केलाय. त्यांनी सगळ्यात महत्वाच म्हणजे सनावळ्या आणि आडनाव टाळली आहेत..
फोकस फक्त शंभूराजे आणि त्यांच्या लढाया आहेत.
लहू लसत सिंदूर सम, खूब खेल्यो रनरंग ।
ज्यो रवि छवि लखत ही, खद्योत होत बदरंग ।
त्यो तुव तेज निहारी के तखत तज्यो अवरंग ||
(रावणाच्या सभेत ज्या प्रमाणे हनुमानाला बांधून आणले होते त्याप्रमाणे संभाजीराजास औरंगजेबासमोर उपस्थित करण्यात आले आहे. हनुमानाच्या अंगाला जसा शेंदूर शोभून दिसतो तसे घनघोर युद्धामध्ये रक्ताने अंग माखल्याने, हे राजन, ते तुला शोभून दिसत आहे. ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो त्याप्रमाणे तुझे तेज पाहून औरंगजेबाने तुला ताजीम देण्यासाठी आपल्या सिंहासनाचा त्याग केला आहे.)
या चित्रपटाच्या निमित्ताने का होईना पण इतिहास वाचा.
Vicky Kaushal Laxman Utekar Rashmika Mandanna Santosh Juvekar
Vrushali Navaghane Mangade
टिप्पणी पोस्ट करा